भंडारा -25 जानेवारीला भाजपतर्फे भंडारा जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी शासनावर आणि पालकमंत्र्यांवर अतिशय गंभीर आरोप भाजपाचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याविषयी पालकमंत्री विश्वजित कदम यांना विचारले असता भाजप हे आरोप करताना त्यांना लाज कशी वाटली नाही, मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांच्याच काळात मोठे भ्रष्टाचार झाले होते. मी पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असून, वाळू घाट या सारख्या फालतू विषयात मी कधीही हात घातला नाही. त्यापेक्षाही हे करण्याची मला गरज नाही, कारण मी कोण आहे याविषयी महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश जाणतो असे वक्तव्य त्यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये केले आहे.
मागच्या पाच वर्षात केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार
महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूचे सरकार असल्याचा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता. याला उत्तर देताना पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी असा आरोप करताना भाजपाला लाज कशी वाटत नाही असे प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे शासन होते. या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. नोट बंदीच्या काळातही कशा प्रकारे भ्रष्टाचार केला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. देशातील अब्जाधीश रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या मोठ्या उद्योगपतींना देशाबाहेर पळून जाण्यासाठी याच शासनाने मदत केली. या शासनाच्या कालावधीत झालेले बरेच भ्रष्टाचार उघडकीस आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे दुःख भाजपला दिसत नाही
मागील तीन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. भाजपने शेतकऱ्याच्या विरोधात कायदे आणले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांची फसवणुक करणारे आहेत, त्यांना हमीभाव न देणारे आहेत, त्यामुळे हे शेतकरी मागील तीन महिन्यापासून थंडीत बसून त्याचा विरोध करत आहेत. त्यापैकी काही शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मात्र भाजपा सरकारला त्यांच्या भावना त्यांचे अश्रू दिसत नाहीत आणि असे भाजपाचे लोक आमच्यावर आरोप करतात हे निश्चितच हास्यास्पद आहे.
विश्वजीत कदमांचे फडणवीसांना प्रत्युत्तर महाराष्ट्रात शेतकरी कायदा लागू होणार नाही
शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला केंद्राचा कायदा महाराष्ट्रात लागू केला जाणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांची असून, 25 तारखेला आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात आमंत्रित सर्व पक्षातील लोक आले होते. शिवसेनेने या कायद्याचा विरोध केला आहे. शिवसेनेचे देखील या आंदोलनाला समर्थन असल्याचे यावेळी विश्वजित कदम यांनी म्हटले आहे.
मी पालकमंत्री म्हणून आपली संपूर्ण जबाबदारी पाडतो आहे
भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना विश्वजीत कदम म्हणाले की,कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सुरुवातीला मी जिल्ह्यात येऊ शकलो नसलो, तरी लॉकडाऊननंतर जिल्ह्यात अनेकदा बैठका घेतल्या. अतिवृष्टी होऊन पूर आल्यानंतर तीन दिवसीय दौरा करून पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. मुंबईमध्ये भंडारा जिल्हाशी संबंधित बऱ्याच बैठका घेतल्या. नऊ तारखेला झालेल्या दुर्दैवी घटनेत पहिल्या दिवशी दहापैकी आठ कुटुंबाला स्वतः भेट दिली आणि त्यामुळे विरोधकाच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाळू घाटासारख्या विषयात मला रस नाही
भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री आल्यावर वाळू घाट आणि दारू अड्डे चालवण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतात, या भाजपाच्या आरोपांना उत्तर देताना पालकमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले की, मी कोण आहे याची जाणीव केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आहे. त्यामुळे वाळू घाटासारख्या शुल्लक विषयात मी कधीही लक्ष घातला नाही.
केवळ आरोग्य विभागाची चौकशी पूर्ण
9 तारखेला झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी विविध विभागाद्वारे केली जात असून, केवळ आरोग्य विभागातर्फे केली गेलेली चौकशीचा अहवाल पुढे आला आहे, आणि त्यानुसारच आरोग्य खात्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. इतर विभागाची चौकशी अहवाल पुढे आल्यानंतर त्या चौकशीच्या अहवालाच्या आधारे पुढे काय कारवाई करता येईल ती निश्चित करू. कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही मात्र कुठल्याही निर्देश व्यक्तीला शिक्षा होऊ नये हेही बघितल्या जाईल. भंडारा जिल्ह्यातील निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करणे किंवा रुजू करणे हा आरोग्य विभागाचा निर्णय आहे. यापुढील चौकशीत त्यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.