भंडारा - देशात टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग सुरू आहे. मात्र, सध्या तरी काही गोष्टींवर निर्बंध आहेत. यापैकीच एक म्हणजे, महाराष्ट्रात सुरू असलेली जिल्हाबंदी. भंडारा जिल्ह्यात 9 मुख्य ठिकाणी सीमाबंदी करण्यात आलेली आहे. मात्र, सीमाबंदी नावापूरतीच उरलेली आहे. त्यामुळे या सीमेवरून आता कोणीही जिल्ह्यात प्रवेश करू शकतो किंवा जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकतो, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यातील सर्वात मुख्य सीमा ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील खरबी गावाच्या टोकावर असलेली सीमा आहे. लॉकडाऊननंतर या सीमेवर कडक बंदोबस्तात तपासणी केली जात होती. त्यामुळे जिल्ह्यात परवानगी न घेता कोणीही येऊ शकत नव्हता. मात्र, जून महिन्यात ही परिस्थिती आता बदललेली आहे. आजही या ठिकाणी पोलीस चौकी आहे, आरोग्य विभागाची यंत्रणाही आहे. मात्र तपासणी आणि निर्बंध यामध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आढळत आहे.