भंडारा - जिल्ह्याच्या तुमसर-बपेरा मार्गावरील खैरलांजी गावाजवळ भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित झाल्याने पुलावरून खाली कोसळून दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोन्ही युवक मंगळावर रात्री नागपूरातून घरून निघाले होते. मात्र, त्यांचा थांग पत्ता लागत नव्हता. बुधावरी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या शोध घेतला असता हे पुलाच्या खाली पडून मृत्यू झाल्याचे लक्षात आले. समीर राऊत आणि संगीत चौधरी असे मृत तरुणांचे नाव आहे.
अनियंत्रित दुचाकी पुलावरून नाल्यात कोसळल्याने दोन तरुणाचा जागीच मृत्यू नागपूर आणि मध्यप्रदेश येथील रहिवासी -
नागपूर येथील रहिवासी संजय उर्फ समिर राकेश राऊत (वय - 22) पिलीनदी नागपूर आणि संगीत हशिंद्र चौधरी (वय- 20, रा. छतेरा, जि. बालाघाट) हे दोघेही मंगळवारी रात्री दुचाकीने नागपूरवरून बालाघाट जिल्ह्याकडे जात होते. तुमसर-बपेरा मार्गावरील खैरलांजी गावाच्या नाल्यावरून जाताना रात्री दुचाकी अनियंत्रित झाली असावी आणि त्यामुळे संतुलन बिघडून दुचाकीसह दोघेही पुलावरून नाल्यात कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असा प्राथमी अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बालाघाट न पोहोचल्याने कुटुंबाने केला शोध सुरू -
हे दोन्ही तरुण बालाघाट जिल्ह्यातील छतरा या गावी पोहोचले नाहीत त्यामुळे मृत संगीत चौधरी याच्या पालकांनी मृत संजय राऊत यांच्या पालकांना फोन करून त्यांची चौकशी केली तेव्हा ते दोघेही मंगळवारी रात्रीच निघाले असल्याचे समोर आले. नागपुर वरून निघाले असले तरी ते छत्ररा या गावी न पोहोचल्याने दोन्ही कुटुंबांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा हे दोन्ही तरुण त्यांच्या दुचाकीसह पुलावरून खाली पडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिस ठाण्याला दिल्यानंतर गावकरी आणि पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आणि या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
घातपात तर नाही या दृष्टीनेही तपास सुरू -
दुचाकी ही भरधाव वेगाने असल्याने तसेच रात्री त्या भागात अंधार असल्याने या पुलाचा बहुतेक अंदाज आला नसावा. ही भरधाव दुचाकी पुलावरून खाली कोसळून या दोघांचाही मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असला तरी यामागे घातपात तर नाही ना यादृष्टीने पोलीस सध्या तपास करत आहेत.