भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात पुन्हा दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला असून या दोन्ही रुग्णांच्या घश्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या पूर्वीही दोन रुग्णांचा या विशेष वार्डात मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या घशातील स्वॅबच्या नामुन्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आला होता. तर 27 एप्रिल रोजी मिळालेल्या भंडारा जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला आयसोलेशन वार्डात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, काही तासातच तिचा मृत्यू झाला. या 50 वर्षीय महिलेला क्षयरोग झाला होता, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. मात्र, खबरदारी म्हणून तिच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यात आले आहे.
तर दुसरी मृत पावलेली 30 वर्षीय महिलेला गेल्या ३ दिवसांपासून सर्दी, खोकला होता. मंगळवार (दि. 28 एप्रिल) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. भरती करण्याच्या काही तासातच या महिलेचा आयसोलेशन वॉर्डात मृत्यु झाला. या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला या विषयी सध्यातरी सांगणे कठीण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.