भंडारा -जिल्ह्यातील दोन घोड्यांना ग्लाडर्स आजार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घोडे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेले घोडे व्यवसायिक ग्लाडर्स या आजारामुळे पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहेत. दोन घोड्यांमध्ये हा आजार सापडल्यामुळे जिल्ह्यातील घोड्यांच्या सर्व प्रकारच्या कामावर बंदी आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. हा आजार घोड्यापासून मनुष्यामध्ये होण्याचा एकही घटना भारतात झाली नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे जिल्हा पशुधन उपायुक्त यांनी सांगितले आहे.
नियमित तपासणीत पुढे आले आजार -
दरवर्षी घोड्यांची नियमित तपासणी केली जाते. यावर्षीही जिल्ह्यातील चार घोड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दोन घोडे या आजारासाठी सकारात्मक आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाकडून काही निर्बंध टाकण्यात आले आहेत. बाधित आणि अन्य घोड्यांचे कुठेही स्थानांतरण करू नये, सोबतच घोडे मालकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
भंंडारा जिल्ह्यातील 2 घोड्यांना ग्लाडर्स आजार या आजारावर उपचार नसल्याने प्राण्यांना दयामरण - ग्लाडर्स हा आजार अश्ववर्गीय प्राणी घोडा, खच्चर, गधे यांना होतो. या आजारावर उपचार नसल्याने दयामरण हाच एकमेव शेवटचा उपाय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच जिल्ह्यातील बाधित दोन्ही घोड्यांना शासकीय नियमाप्रमाणे दयामरण दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
26 पैकी 17 ची तपासणी झाली -
भंडारा जिल्ह्यात एकूण 26 घोडे आहेत. यापैकी आत्तापर्यंत १७ घोड्यांची तपासणी करून घोड्यांचे रक्तजल नमुने हरियाणा राज्यातील हिस्सार येथील शाळेत पाठविण्यात आले आहेत. उर्वरित तपासण्याही लवकरात लवकर करण्यात येणार आहेत, तोपर्यंत बाहेर जिल्ह्यातील घोड्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी किंवा जिल्ह्यातील घोड्यांना बाहेर जिल्ह्यात नेण्यासाठी तसेच सार्वजनिक कार्यक्रमात किंवा कुठल्याही कार्यक्रमात घोड्यांना नेण्याचा बंदी आदेश शासनाद्वारे काढण्यात आले आहेत.
नागरिकांनी घाबरू नये -
या आजारावर कुठलाही उपचार नसला तरी हा आजार जनावरांपासून जनावरांपर्यंत पसरतो मात्र जनावरापासून मनुष्यांना पसरण्याची घटना सध्या तरी भारतात नोंद झाली नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला जिल्हा पशुधन उपायुक्त यांनी दिला आहे. मात्र तरीही घोड्यांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
पुन्हा आर्थिक संकटात घोडे व्यवसाय -
कोरोना काळात सर्व व्यवहार बंद असल्यामुळे घोडे व्यवसाय बंद होते. त्यामुळे या वर्षभरात या घोडे व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले होते. व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर या घोडे व्यवसायिकांना लग्न समारंभ आणि इतर सार्वजनिक ठिकाणी काम मिळू लागले होते. मात्र या ग्लाडर्स आजाराने पुन्हा त्यांचे काम बंद झाले असून त्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे.