भंडारा :मागील आठ दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे शेती कामाला चांगलाच वेग आलेला आहे. मात्र अचानक शेती काम सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मिळेल त्या गावातून मजूर आणावे लागतात. लाखनी तालुक्यातील गढपेंढरी येथील अशोक गायधने या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील रोवणीसाठी लाखनी तालुक्यातील भुगाव मेंढा येथील जवळपास पंधरा स्त्री-पुरुष हुंडा (गुता) पद्धतीने रोवणीसाठी आणले.
विहीरीत विषारी गॅस :बुधवारी सकाळी शेतात रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. महिला हे रोवणीचे काम करत होत्या, तर पुरुष हे महिलांपर्यंत रोप (पेंढ्या) नेऊन देण्याचे काम करत होते. हे सर्व सुरळीत सुरू असतांना पुरुष जवळ असलेल्या पडक्या विहारीजवळ गेले. विहिरीत त्यांना एक मोठा कासव कासव दिसला. कासव काढण्याचा मोह या तिघांना आवरता आला नाही. कासव काढण्यासाठी प्रथम एक व्यक्ती खाली उतरला. मात्र, विहीरीचा वापर बंद असल्यामुळे तिथे विषारी गॅस तयार झाला होता. त्यामुळे खाली गेलेला व्यक्ती पाण्यात गटांगळ्या खात होता, हे बघून त्याला वाचविण्यासाठी वर असलेले दोघेही विहीरीत उतरले. मात्र, खाली उतरताच त्यांचा देखील श्वास गुदमरू लागल्याने त्यांनी 'वाचवा, वाचवा' म्हणून ओरडायला सुरुवात केली. रोवणी करणाऱ्या महिला मजुरांना त्यांचा आवाज येताच त्या विहिरीकडे धावल्या. तेव्हा त्यांना विहीरीत पुरुषांचा श्वास गुदमरल्याने ते कासावीस होताना दिसले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी ओरडावरून सुरू केली. मात्र, जवळपास इतर पुरुष नसल्याने कोणीही मदतीला आले नाही.