भंडारा- एकमेव कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने भंडारा जिल्हा 10 तारखेला कोरोना मुक्त झाला. मात्र, शनिवारी पुन्हा भंडारा जिल्ह्यात दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही रुग्ण पुण्यावरुन नुकतेच जिल्ह्यात आले होते, त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते.
भंडारा जिल्ह्यात सापडले 2 नवीन कोरोना रुग्ण; पुण्यावरुन आलेले दोघे पॉझिटिव्ह
कोरोनामुक्त झालेल्या भंडारा जिल्ह्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. नागरिकांना आता फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात गेल्या सोमवारपासून मोठ्या प्रमाणात लोक बाहेरून गावावरून येत आहेत. त्या सर्वांना होम क्वारंटाइन केले जात होते. मात्र, येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून 14 तारखेपासून बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जावे, असा आदेश काढला. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइन केले जात आहे. प्रत्येकाचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठविणे सुरू आहे.
14 तारखेला पुण्यावरुन आलेल्या दोन व्यक्तींना क्वारंटाइन केले गेले आणि त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठविण्यात आले होते. शनिवारी या दोन्ही व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भंडारा जिल्हा हे कोरोनामुक्त झाला होता त्यामुळे बऱ्याच गोष्टीत सूट मिळाली होती. त्यामुळे नागरिकही निश्चिंत झाले होते. बरेच लोक फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नव्हते मात्र आता सर्वांना पुन्हा नियम पाळावे लागणार आहेत.