भंडारा - आमदार राजू कारेमोरे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम जामिन देत दिलासा दिला आहे. दिवाणी न्यायालयाने आमदार कारेमारे यांचा जामीन रद्द केल्यानंतर तासाभरातच जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार कारेमारे यांचा जामिन मंजूर केला आहे.
तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना किमान सोमवारची रात्र ही तुरुंगात घालावी लागणार होती. कारण आमदार राजू कारेमोरे यांना सोमवारी अटक केल्यानंतर दिवाणी व फौजदारी न्यायालय मोहाडी येथे हजर केले असता न्यायालयाने जामीन रद्द केला होता. न्यायालयाने आमदार कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना त्यांच्या वरठी येथील घरातून अटक केली. अटकेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणी झाल्यानंतर मोहाडी येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
जामीन रद्द केल्याने थेट तुरुंगात रवानगी-
मोहाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सुनावणी दरम्यान न्यायालयाने आमदारांना जामीन नामंजूर केला. 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमांमध्ये विनयभंगाच्या गुन्ह्याचा समावेश असल्याने आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने आमदारांना जामीन नाकारल्याने त्यांना आजची रात्र भंडारा जिल्हा कारागृहात काढावी लागणार होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने जामिन दिल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम टळला आहे.
काय घडले होते प्रकरण-
जिल्हाच्या तुमसर- मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री आमदार राजू कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे आमदार कारेमोरे यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत धिगांणा घातला. आमदार राजू कारेमोरे धिंगाणा घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. मारहाण झालेल्या दोन व्यापाऱ्यांनी पोलिसांनी 50 लाख रुपये रोख आणि सोन्याची साखळी चोरून नेल्याचा आरोप केला. तसेच विनाकारण मारहाण केल्याची तक्रार दिली होती. तर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याची तक्रार पोलिसांनी नोंदविली होती. दोन दिवसाच्या चौकशीनंतर आज राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आलेली आहे. भंडारा येथून अटक करून त्यांना मोहन पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना मोहाडी येथील न्यायालयात हजर करणार आले.