भंडारा - जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेला. सुदैवाने नागरिकांच्या प्रयत्नातून ट्रक चालकाला वाचविण्यात यश आले आहे. तर मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील 50 वर्षीय पुरुष हा नाल्यात वाहून गेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे साकोली तालुक्यातील बोदरा गावातील तलाव फुटल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पाणी आले. तर एकोडी रस्त्यावरील रामतलावमध्ये जास्त झालेले पाणी याच राष्ट्रीय महामार्गावर आले. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा ट्रक आणि चारचाकी वाहनांच्या रांग लागल्या होत्या.
पुलावरील पाणी कमी झाल्यानंतर काही लोकांनी रस्त्यावरून ट्रक काढण्यास सुरवात केली. मध्यप्रदेशच्या रायपूर येथून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकचे चालक रमेश कुमार जयराम जाट यांनीही ट्रक पुलावरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या प्रवाह अधिक असल्याने ट्रक हा पाण्याच्या प्रवाहात पलटी झाला. ट्रक तिथेच पुराच्या पाण्यात अडकल्याने चालकाने लगेच ट्रकवर चढून मदतीसाठी जवळील लोकांना हाका मारण्यास सुरुवात केली.
तिथे असलेले इतर ट्रक चालक हिंमत दाखवून पुलावर शक्य तेवढ्या भागात पोहोचल. त्यापैकी एकाने दोरीच्या साहाय्याने पुढे जाऊन ती दोरी ट्रकचालक जयराम यांच्यापर्यंत पोहोचविली. ट्रकचालकाला दोरीने बाहेर ओढण्याचे इतर वाहनचालकांनी प्रयत्न केले गेले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जवळ उपस्थित असलेल्या सर्वांनी मिळून ट्रकचालकाला ट्रकमधून बाहेर काढले. उपस्थित ट्रक चालकांनी दाखविलेल्या हिमतीमुळे ट्रकचालका वाचविण्यात यश आले.
तर दुसऱ्या घटनेत मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील गोविंदा गोबाडे (50 ) हे जांभोरा गावी जात होते. वाहत जाणारा चप्पल पकडताना त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते नाल्यातून वाहत गेल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली आहे. प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.