भंडारा - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोथुर्ण गावात ही घटना घडली. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद उके (वय-35) असे तरुणाचे नाव आहे.
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - Accident death
भंडारा जिल्ह्यातील वाळू घाट बंद आहेत अशात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर अतिशय वेगाने वाहन चालवितात. भरधाव रस्त्यावर धावणाऱ्या बेकायदेशीर रेती वाहतुकीला कुणाचीच भीती नाही त्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत.
मंगळवारी (2 जून) मृत शरद उके हा काही कामानिमित्त वरठी येथे गेला होता. सायंकाळी गावाला परत जात असताना गावापासून एक किमी दूर अंतरावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यात त्याचा जागेवर मृत्यू झाला. जिल्ह्यातील वाळू घाट बंद आहेत अशात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर अतिशय वेगाने वाहन चालवितात. भरधाव रस्त्यावर धावणाऱ्या बेकायदेशीर रेती वाहतुकीला कुणाचीच भीती नाही त्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळावर पोहचत चक्का जाम केला.
मृताच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देऊन रेती वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आर्थिक मदत मिळणार नाही आणि या रस्त्यावरची अवैध वाहतूक थांबणार नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. गावात सध्या तणाव असून मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच वरठीचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात घटनास्थळी ताफ्यासह उपस्थित झाले. तसेच भंडारा येथून अतिरिक्त कुमक बोलवण्यात आली आहे. रेती ट्रॅक्टर गावातील व्यक्तीचा आहे. मृताच्या मागे आई, वडील पत्नी व दोन अपत्य असल्याची माहिती मिळाली आहे. खबरदारी म्हणून गावात पोलीस तैनात केले असून कुटुंबियांना समजण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत.