भंडारा - तिबेटची भाषा, तिबेटीयन धर्म आणि तिबेटियन संस्कृती ही भारताची देण आहे. चीन आपल्या विध्वंसक नीतीने तिबेटची संस्कृती नष्ट करत असल्याचा आरोप निर्वासित राष्ट्रपती पेंपा त्सेरिंग यांनी केला. ते गुरुवारी रात्री भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारताने तिबेटला सतत मदत केली आहे. मात्र चीनवर अजून दबाव नीतीचा अवलंब केल्यास तिबेटच्या संस्कृतीचे नक्कीच रक्षण करता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमचे नाते भारताशी आहे चीनशी नाही
तिबेटमध्ये बोलली जाणारी भाषा ही भारतापासून घेतलेली आहे. एवढेच नाही तर बौद्ध धर्म आणि तिबेटची संस्कृती हे ही भारताची देण आहे. त्यामुळे आमचे भारताशी भाषिक सांस्कृतिक आणि धार्मिक नाते आहे. चीनशी मात्र आमचे वैचारिक, धार्मिक, सांस्कृतीक कोणतेही संबंध नाहीत. मात्र तिबेटवर कब्जा करून चीन आता चीनी संस्कृती रुजवण्यासाठी तिबेटमध्ये प्राथमिक शिक्षणापासून चिनी भाषा शिकवण्याची सक्ती करत आहे. त्यामुळे तिबेटची खरी संस्कृती कालांतराने लोप पावेल आणि तिबेटचे अस्तित्व धोक्यात येईल. ही संस्कृती वाचवण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. यासाठी भारत आणि अमेरिकेची मदत मिळाल्यास आम्हाला आमची संस्कृती वाचवण्यात यश येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.