भंडाऱ्यात भरदिवसा वृद्धाची दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरट्यांनी लांबवली - भंडाऱ्यात वृद्धाची सोन्याची चेन लांबवली
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी एका वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील 20 ग्रॅमची सोन्याची चेन हातोहात लांबवली. ही घटना भंडारा शहरातील खात रोडवरील शक्तीनगर परिसरात घडली आहे.
भंडारा - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी एका वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील 20 ग्रॅमची सोन्याची चेन हातोहात लांबवली. ही घटना भंडारा शहरातील खात रोडवरील शक्तीनगर परिसरात घडली आहे. भंडारा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासून या चोरांचा शोध घेत आहेत.
घरासमोर उभे असताना उडविली चैन -
खात रोडवरील शक्ती नगर येथे राहत असलेले मोरेश्वर तुळशीराम फुंडे (63 वर्ष ) हे त्यांच्या घरी सकाळी दहाच्या दरम्यान उभे असताना दुचाकीवरून दोन तरुण त्यांच्या घरासमोर थांबले आणि त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी चर्चा करू लागले. मोरेश्वर हे त्यांच्या घरातील कम्पाऊंडमध्ये बनियान घालून होते. तर चोरटे हे गेटच्या बाहेर होते. पत्ता सांगताना मोरेश्वर यांचे लक्ष या चोरट्यांकडून दुसरीकडे जाताच गाडीवर मागे बसलेल्या तरुणांनी मोरेश्वर यांच्या गळ्यातील 20 ग्रॅमची चैन ओढली आणि दुचाकीने पळ काढला. सोन्याची चैन आणि लॉकेट मिळून एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. मोरेश्वर यांनी आरडाओरड करत गेटच्या बाहेर आले मात्र तोपर्यंत दोन्ही चोरटे सुसाट वेगाने निघून गेले.
हे ही वाचा - "निलंबनाची मागणी करणाऱ्यांचेच परमबीर हे आज 'डार्लिंग' झालेत"
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले -
या घटनेनंतर मोरेश्वर यांनी भंडारा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. नागरिकांनी आणि पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेतला मात्र हे परिसरातून पसार झाले. यानंतर पोलिसांनी या परिसरातील शक्य तेवढे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून बघितले. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन तरुण दुचाकीने दिसत आहेत. मात्र अजून पर्यंत पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत.
हे ही वाचा - शोपियामध्ये चकमक : सुरक्षा रक्षकांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, इंटरनेट सेवा बंद
बाहेर राज्यातील तरूण असल्याचा संशय -
हे तरुण भंडारा जिल्ह्यातील नसून भंडारा जिल्हा लगत असलेल्या मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यातील असल्याचा संशय भंडारा जिल्ह्याच्या पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे या विषयी अधिक माहिती पोलिसांनी दिली नाही मात्र लवकरच या चोरट्यांचा शोध लावू असे पोलिसांनी यावेळी सांगितले.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण -
भरदिवसा खात रोड सारख्या रहदारीच्या परिसरात जर अशा पद्धतीने चोरीच्या घटना घडत असतील तर नागरिक सुरक्षित कसे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांना लवकरात लवकर पकडून परिसरातील दहशत कमी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.