महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साकोली बँक ऑफ इंडियामध्ये चोरी करणारा चोरटा जेरबंद; १ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Bhandara Superintendent of Police Arvind Salve News

साकोली येथील बँक ऑफ इंडियामध्ये महिनाभरापूर्वी १ कोटी ९३ लाखांची चोरी झाली होती. या चोरीतील आरोपीला महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर भंडारा पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपी बरोबर पोलीस अधिकारी

By

Published : Nov 21, 2019, 11:04 PM IST

भंडारा- साकोली येथील बँक ऑफ इंडियामध्ये महिनाभरापूर्वी १ कोटी ९३ लाखांची चोरी झाली होती. या चोरीतील आरोपीला महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून १ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा बँकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता.

माहिती देताना भंडारा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे

साकोली येथील बँक ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये १८ ऑक्टोबर रोजी चोरी झाली होती. इमारतीच्या मागच्या बाजूने ग्रील तोडून बँकेच्या सेफ केसमधील ग्राहकांनी तारण ठेवलेले ४ किलो २०० ग्राम सोन्याचे दागिने ज्याची अंदाजे किंमत १ कोटी ६५ लाख आणि नगदी २४ लाख ५५ हजार व बँकेतील ३ लाख ५० हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, असे एकूण १ कोटी ९३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. अज्ञात चोरट्यांविरुद्ध बँकेच्या व्यवस्थापकांनी साकोली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात संपूर्ण पोलीस यंत्रणा निवडणुकीच्या सुरक्षेसाठी कामाला लागली होती. अशात ही मोठी चोरीची घटना घडल्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. भंडारा पोलीस अधीक्षक अरविंद साबळे यांनी याप्रकरणाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली. गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे विविध लोकांच्या चौकशा केल्या. चौकशीनंतर १ नोव्हेंबर रोजी जागेश तरजुले या आरोपीला अटक करून त्याच्याकडून ६ लाख ९ हजार ५५० रुपये नगदी व सोन्याचे दागिने किंमत २ लाख १७ हजार ६६३ रुपये असा एकूण ८ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल भैयालाल बोरकर हा तोपर्यंत फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे, गोवा, रायपूर अशा विविध ठिकाणी सतत आपली पोलीस यंत्रणा पाठवून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दर वेळेस हा आरोपी पोलीस पोहोचण्या अगोदर त्या ठिकाणावरून पळ काढायचा. मात्र, पोलीसही हार न मानता मागील वीस-पंचवीस दिवसांपासून सतत त्याच्या मागावर राहिले. शेवटी छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे हा आरोपी असल्याचे माहिती होताच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे आपल्या पथकासह बिलासपूरला गेले.

आरोपी विशाल बोरकर याने बिलासपूर येथे भाड्याची खोली घेतली होती. मात्र, तो खोलीवर क्वचितच येत होता. पोलिसांनी त्या खोलीवर सतत पाळत ठेवून बिलासपूर येथील पोलिसांच्या मदतीने विशाल बोरकर या मुख्य आरोपीला २० तारखेला अटक केली. त्याचबरोबर, चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी नगदी १० लाख ८४ हजार आणि १ कोटी ६३ लाख ९८ हजार ३४० रुपयांचे दागिने, तसेच चोरीच्या पैशांमधून खरेदी केलेले साहित्य, असा एकूण १ कोटी ७४ लाख ९२ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल आरोपी विशाल बोरकरकडून हस्तगत केला.

बँक चोरीच्या या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ८३ लाख १६ हजार ५५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात भादवीच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून अजूनही नवनवीन माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-जीवंतपणी झाले वेगळे मृत्यूनंतर आले एकत्र; भंडाऱ्यात पत्नीच्या मृत्यू नंतर पतीचाही मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details