भंडारा- जिल्ह्यामध्ये एकूण १२०६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले असून रविवारी सर्व पोलिंग पार्ट्या आपापल्या मतदान केंद्रांवर मतदान पेटी आणि साहित्य घेऊन रवाना झाले आहेत.
१२०६ मतदान केंद्रापैकी १९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. तर ७ सखी मतदान केंद्र आणि ७ आदर्श मतदान केंद्र होणार आहे. १२५ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार आहे. जिल्ह्यामध्ये भंडारा विधानसभा, तुमसर विधानसभा आणि साकोली विधानसभा, असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. यासाठी ५२०२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रविवारी दुपारनंतर या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. यासह १२ फिरते पथक तर १२ व्हिडिओ निरीक्षक पथक निर्माण करण्यात आले असून सोमवारी मतदानाच्या दिवशी त्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे.
जिल्ह्यामध्ये ५ हजार २७० दिव्यांग मतदार आहेत. या दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यात ९८२ अपंग मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ५५४ तीन चाकी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. १२५ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार असून यामध्ये तुमसर तालुक्यातील ३५, भंडारा मतदार संघात ५० तर साकोली विधानसभा क्षेत्रातील ४० मतदान केंद्रात वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.