भंडारा- जिल्ह्यातील चोरांना पोलिसांची भीती उरली नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील एका चोरट्याने चक्क पोलीस शिपायाची वर्दी चोरली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस शिपायाची वर्दीच त्यांच्या घरुन चोरुन नेल्याच्या धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघड झाला असून, या प्रकरणी भंडारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हरांड्यातून उडवली वर्दी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत पोलीस शिपाई कौशिक गजभिये हे भंडारा शहरातील संत तुकडोजी वॉर्ड, एल.आय.सी. ऑफिसच्या मागे किरायाने राहतात. 5 जूनला घटनेच्या मध्यरात्री ते आपल्या कर्तव्यावर होते. त्यादरम्यान त्यांच्या घरातील मुख्य व जिन्याचे गेट खोलून अज्ञात चोराने आत प्रवेश करत हँगर वर अडकवलेली जूनी वर्दी लंपास केली. यात पँट, नेम प्लेट, शर्ट वरील म.पो. चे पोलीस टॅग, बक्कल नंबर असलेला बेल्ट, किंमत दीड हजार रुपयांची बॅग व नगदी २०० रुपये आदींचा समावेश होता. तसेच रूम खाली असलेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या ऑफिसचे कुलूप तोडून 300 रुपये चोरुन नेले आहे.