बिबट्याचे कातडे आढळले चक्क वन विभागाच्या कपाटात - BHANDARA
तुमसर तालुक्यात तीन वाघांच्या शिकारीचे प्रकरण ताजे असताना मोहाडी तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्राच्या कार्यालयातील कपाटामध्येच बिबट्याचे कातडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कातड्याची नोंद नसल्याने हे कोणी आणि कधी आणले याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.
![बिबट्याचे कातडे आढळले चक्क वन विभागाच्या कपाटात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3785835-1001-3785835-1562644731898.jpg)
वन विभागाच्या कपाटात बिबट्याचे कातडे आढळले आहे
भंडारा- तुमसर तालुक्यात तीन वाघांच्या शिकारीचे प्रकरण ताजे असताना मोहाडी तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्राच्या कार्यालयातील कपाटामध्येच बिबट्याचे कातडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कातड्याची नोंद नसल्याने हे कोणी आणि कधी आणले याचा तपास करण्यासाठी नागपूर विभागाच्या चमूने सोमवारी दिवसभर तपासणी केली.
वन विभागाच्या कपाटात बिबट्याचे कातडे आढळले आहे
या प्रकरणाचा तपास घेण्यासाठी नागपूरहून पथक भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी सोमवारी दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणासंबंधी विचारले असता अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात वन विभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २८ जूनला तुमसर तालुक्यातील सीतासांवगी परिसरात वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. आता या बिबट्याच्या कातड्याच्या प्रकरणानंतर वनविभाग स्वतःचे कातडे वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे.
या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी व्हिजिलन्स विभाग नागपूरचा एक चमू सोमवारी भंडारा जिल्ह्यात आला. मात्र, या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. स्थानिक आमदार चरण वाघमारे यांना यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली. या प्रकरणानंतर बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. हे कातडे नेमके कपाटात कोणी ठेवले, ते मिळताच त्याची माहिती वरिष्ठांना तेव्हाच का दिली गेली नाही. याची नोंद आहे की नाही याचा तपास का केला गेला नाही. या प्रकरणात भंडारा उपवनसंरक्षक चकोले यांनी स्वतः त्याची शाहनिशा का केली नाही. जर चकोले यांच्या माहितीनुसार हे प्रकरण खूप मोठे नाही तर नागपूर वन वरिष्ठांना येण्याची गरज का पडली आणि चौकशी अधिकारी या विषयी का बोलत नाहीत, असे प्रश्न निर्माण होत आहेत.