कोरोनासाठी मिळालेल्या निधीवर तहसीलदाराने मारला डल्ला, चौकशीची मागणी
जिल्ह्यातील मोहाडी येथील तत्कालीन तहसीलदाराने कोरोना निधीची अफरातफर केली असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांके करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
भंडारा - जिल्ह्यातील मोहाडी येथील तत्कालीन तहसीलदाराने कोरोना निधीची अफरातफर केली असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना केंद्र सरकारने कोरोनापासून होणाऱ्या प्रतिबंधनात्मक उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक तहसीलदाराला तो निधी खर्च करण्याचा अधिकार देण्यात आले आहेत. हा निधी तहसीलदाराने खर्च न करता खोटे बिल जोडून घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.
देशात कोरोनामुळे अनेक लोक आपल्या जिल्ह्यात आले असताना त्यांच्या उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर शासनांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. भंडारा जिल्ह्यातसुद्धा निधी मिळाला असून, मोहाडी येथील तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनासुद्धा ६ लाख २५ हजार इतका निधी देण्यात आला होता. या निधीमधून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून क्वारंटाईन सेंटर व गरजू लोकांना वाटप करायचे होते. तसेच कर्मचाऱ्यालासुध्दा सॅनिटायझर द्यायचे होते. या सर्व वस्तू खरेदी केल्या असल्याचे दाखविण्यासाठी तहसीलदार यांनी फाईलमध्ये बील जोडले. मात्र, हे सर्व बील जीएसटी विना होते. शासकीय खरेदीही जीएसटी असलेल्या बीलने केली जाते. त्यामुळे तहसीलदार यांनी खोटे बील सादर करून निधीची अफरातफर केली असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. या विषयीची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिली आहे.