भंडारा - मोहाडी तालुक्यातील बीड (सितेपार) गावात ताज मेहंदी बाबा यांच्या दरबारात मकर संक्रांतीनिमित्त तीन दिवसीय यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी यात्रेमध्ये विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.
भंडारामध्ये ताज मेहंदी बाबांची ३ दिवसीय यात्रा हेही वाचा-बोगस 'रॉ' अधिकाऱ्याचा पर्दाफाश; पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात झाला होता दाखल
ताज मेहंदी बाबा यांचा जन्मदिवस आज 14 जानेवारीला होता. या दिवसापासूनच दरवर्षी बीड येथे ही यात्रा भरविली जाते. 1994 मध्ये बीड गावात या ताज मेहंदी बाबा यांच्या दरबाराची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी येथे ३ दिवशीय यात्रा भरते. ताज मेहंदी बाबा यांच्या दरबारात भरणारी ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक आहे. कारण ताज मेहंदी हे मुस्लीम असले तरी त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूंची संख्या सर्वात जास्त आहे. एवढेच नाही तर संस्थांची सर्व कमिटी हिंदू सांभाळतात. लोकांना होणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक अडचणी सोडविण्यासाठी येथे लोक येतात. मात्र, सर्वात जास्त लोक हे दारू सोडविण्यासाठी येथे येतात. बाबाच्या चरणी येणाऱ्याची दारू सुटते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच प्रत्येक संक्रातीच्या काळात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातून लोक मोठ्या संख्येने येथे येतात.
दारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, येथे आल्यावर दारू सुटते, असा समज असल्याने तीन दिवसांच्या मुक्कामाला संपूर्ण कुटुंबासह लोक येतात. याठिकाणी तीन दिवस मोठी जत्रा भरते. भजन किर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो. भूत, बाधा आणि दुर्धर आजारापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. तसेच याठिकाणी दारू सुटते, असा दावाही लोक करतात.