महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना 'फास्ट ट्रॅक' मोडवर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे- सुनील केदार

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जवाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी महसूल, कृषी विभाग आणि बँकेंच्या प्रतिनिधींना दिल्या. 30 जूनपूर्वी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे सुनील केदार म्हणाले.

Sunil Kedar
सुनील केदार

By

Published : Jun 30, 2020, 3:27 PM IST

भंडारा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशा वेळी कृषी क्षेत्राच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीक कर्जासाठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना फास्टट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. पीक कर्ज वाटपासाठी महसूल, कृषी विभाग व बँक असा टास्कफोर्स तयार करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्हा परिषद सभागृहात विविध विषयांचा आढावा पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

426 कोटी 25 लाख रुपये इतक्या रुपयांचे पीक कर्ज खरीपासाठी वितरण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 48 हजार 247 सभासदांना 239 कोटी 67 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. पीक कर्ज 30 जून पर्यंत वितरित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज वाटपाचा लाभ देण्यात आला. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत भंडारा जिल्ह्यात 31 हजार 421 सभासदापैकी 22 हजार 428 तपासणी झाली आहे. 20 हजार 137 सभासदांना वितरित करण्यासाठी 107 कोटी 40 लाख रुपये प्राप्त झाले असून ते खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामात 1 लाख 3 हजार 87 सभासदाकडून 32 लाख 10 हजार 802 क्विंटल धान खरेदी केली. तर रब्बी हंगामात 95 केंद्रावर आजपर्यंत 6 हजार 177 शेतकऱ्यांकडून 2 लाख 43 हजार 448 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. धान भरडाई बाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये धानाचे सरासरी किती उत्पादन होते याचा अंदाज घेऊन धानाचे केंद्र वाढविण्याबाबत निर्णय घेतला जावा, असे सुनील केदार म्हणाले. धान खरेदी केंद्र उभारण्यासाठी येणाऱ्या अर्जाची यादी करून गोडाऊन उभारण्यासाठी वखार महामंडळाकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्ह्यात वैयक्तिक खातेदार 77 हजार 438 पात्र झाले. सामाईक खातेदारामध्ये 1 लाख 30 हजार 326 खातेदार पात्र ठरले आहे. अपात्र खातेदारांची संख्या मोठी असून या योजनेच्या खातेदारांचा गावनिहाय फेर आढावा घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ही प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी, असे ते म्हणाले.

खरीप हंगाम बी-बियाणे खते वाटप संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात पीक बदल पध्दतीचा प्रयोग राबविण्यात यावा, असेही केदार म्हणाले. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा वापर अधिक करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी म्हटले. जिल्ह्यातील पूर परिस्थिती संदर्भात आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुरामुळे वाहतूक खंडित होणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण व पूल निर्मितीचा आराखडा तयार करावा, असे पालकमंत्री म्हणाले. गावस्तरावर लसी, औषधे व धान्य, साधनसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्यात यावा, असे ते म्हणाले. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details