भंडारा - सनफ्लॅग (आयर्न अँड स्टील) कंपनी कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट झाला आहे. वरठी स्थित सनफ्लॅग कंपनीत कोरोनाचे 39 रुग्ण आढळले आहेत. कंपनीतील कोरोना हा केवळ एका संस्थेपुरता मर्यादित राहणारा विषय नसल्याने कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत गंभीर होणे अपेक्षित आहे. काही काळ कंपनी बंद ठेवावी, अशी मागणी कामगार आणि ग्रामस्थांकडून होत असताना त्याकडे जिल्ह्यधिकारी आणि कंपनी प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याने येणाऱ्या काळात 'सनफ्लॅग' कोरोना बॉम्ब म्हणून पुढे येण्याची शक्यता बळावली आहे.
भंडारा शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या सनफ्लॅग स्टील कंपनीत हजारो कामगार कार्यरत आहेत. अधिकारी संख्याही मोठी आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथून आलेल्या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्रादुर्भाव वाढत गेला. सद्यस्थितीत ३९ अधिकारी आणि कर्मचारी आणि कुटुंबातील लोक बाधित आहेत. एच. आर.आणि ट्रेंनिग विभागातील १०, बीएसएम विभागातील १५, क्वालिटी कंट्रोल विभागातील ४, एसमस विभागातील ३, गेस्ट हाऊस मधील ३ कर्मचारी आणि एक कर्मचाऱ्यांच्या घरातील पाच लोक बाधितांमध्ये असल्याचे समजते.
जवळपास सर्वच विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बाधितांमधील काही नागपूर, तर काही भंडाऱ्यात उपचार घेत आहेत. बाधितांमध्ये अधिकारी, कामगार आणि गुरुवारी कामगारांच्या कुटुंबातील पाच लोकांचा समावेश आहे. काम करत असताना बाधितांपैकी अनेक जण अन्य लोकांच्या संपर्कात आले. त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची चिन्ह आहे.