भंडारा - जम्मू -काश्मीरच्या कुपवाडा येथे आर्मी वाहनाला झालेल्या अपघातात भंडारा जिल्ह्यातील सुपुत्र असलेल्या 36 वर्षीय संदीप उर्फ चंद्रशेखर भोंडे याचे निधन झाले. संदीप उर्फ्र चंद्रशेखर भोंडे हा भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होता. गुरुवारी संदीप हा कर्तव्यावर असताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगणवरुन विलगीकरण केंद्राकडे जात होता. त्याचवेळी सरकुल्ली येथे अनियंत्रित गाडीला अपघात झाला. यात संदीपसहित पाच जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर 168 मिलिट्री हॉस्पिटल ड्रगमुल्ला येथे उपचार सुरु होते. दरम्यान, उपचारादरम्यान भंडारा शहरातील संदीप भोंडे या जवानाचा मृत्यू झाला आहे.
घरापासून सैन्याचा वारसा लाभलेला संदीप हा 2008 मध्ये 21 महार रेजिमेंटमध्ये रुजू झाला. आपली पदोन्नतीची एक-एक पाऊले चढत संदीप झेप घेत होता. 2016 ला संदीपचा विवाह झाला असून, त्याला चार वर्षाचा मुलगा आहे. नुकतीच 75 दिवसाची रजा आटोपून संदीप पाच मार्चला आपल्या कर्तव्यस्थानी गेला होता. तेथून आपल्या पोस्टिंग झालेल्या ठिकाणावर जात असताना वाटेतच जवानांच्या अनियंत्रित वाहनाच्या झालेल्या अपघातात संदीपचा मृत्यू झाला.