भंडारा- संचारबंदीच्या काळात सर्वात जास्त अडचणींचा सामना तळ हातावर पोट असणाऱ्यांना करावा लागत आहे. अशा गरिबांच्या मदतीसाठी आता शासनासोबतच काही सामाजिक कार्यकर्तेसुद्धा धावून आले आहेत. शासनाने बेघर लोकांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. तर, सामाजिक कार्यकर्त्यांनी गरजू लोकांना त्यांच्या घरापर्यंत किराणा, धान्य आणि भाज्या पुरवल्या आहेत. त्यामुळे, या लोकांवर आलेली उपासमार सध्या तरी थांबली आहे.
जिह्यातील बेघर लोकांना शोधून त्यांना शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच बाहेर गावावरून आपल्या गावी परत जाणाऱ्या 54 लोकांना इथे ठेवण्यात आले आहे. त्यांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याची व्यवस्था केली गेली आहे. तसेच जे लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्यांना तांदूळ, गहू, आणि किराणा सामान शासनातर्फे दिले गेले.