भंडारा - तूमसर तालुक्यातील तुडका येथे मधुकर वाडीभस्मे यांच्या घरातील वीजेच्या मीटरची सर्व्हिस वायर शार्ट सर्किट झाल्याने त्यांच्या घरासमवेत तीन घरांना आग लागल्याची घटना शनिवारी घडली. आगीत त्यांच्या घरातील तांदूळ, गहू आणि इतर धान्य, जीवनोपयोगी साहित्य, कपडे, कागदपत्रे, सोने, चांदी अशा मौल्यवान वस्तू पूर्णत:जळून खाक झाल्या. या अग्नितांडवात मधुकर वाडीभस्मे यांच्या मालकीच्या 5 बकऱ्यांचाही होरपळून जागीच मृत्यू झाला असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असताना आगीने रौद्र रूप धारण करत मधुकर वाडीभस्मे यांच्या घरालगतच्या कुंदा पंधरे, निलकंठ पंधरे, गोविंदा भिवगडे, गुणाबाई वाडीभस्मे, नंदराम भिवगडे, निलकंठ पंधरे यांच्या घरावर आगीचे लोळ उडाल्याने यांच्या घरातील साहित्य खाण्यापिण्या योग्य धान्यसाठा, गुरांचा गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी आला. तसेच गुणाबाई वाडीभस्मे यांच्या घरच्या दोन बकऱ्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्याशिवाय एक हिरो होंडा कंपनीची फॅशन-प्रो मोटरसायकल, घरालगत असलेली पान टपरी, घरातील धान्य, कपडे, कागदपत्रे, अग्नीतांडवात पूर्णत: जळून खाक झाली. यात मधुकर वाडीभस्मे यांचे मोठे नुकसान झाले आहे.