भंडारा - देशात कोरोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी 15 मार्चपासून शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, बार, रस्त्यावरील टपर्या यांच्यावर 31 मार्चपर्यंत बंदी घातली आहेच. त्यात आता 20 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एक आदेश काढला असून या आदेशानुसार जीवनावश्यक आणि सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, दुकाने, कारखाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा...मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आजपासून सक्तीची बंदी; रस्त्यांवर शुकशुकाट
21 मार्चपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ज्या लोकांना आदेश प्राप्त झाला त्यांनी त्यांचे दुकाने बंद ठेवली आहेत. तर उर्वरित दुकानदारांनी त्यांचे दुकान सुरू केले असता पोलिसांनी सर्व दुकाने बंद केली. फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवेत मोडणाऱ्या औषधे, भाजीपाला, किराणा आणि दूध यांची दुकाने उघडी ठेवण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केल्यामुळे चारपेक्षा जास्त लोक एकत्रित जमा झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरू असलेली काळीपिवळी प्रवासी वाहतूकसुद्धा 31 मार्चपर्यंत बंद केली आहे. तर रिक्षा अथवा इतर वाहनात दोनपेक्षा जास्त प्रवासी एकावेळी नेता येणार नाहीत.