गोंदिया -घरगुती वादातून एकटीच माहेरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन 3 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत शिवसेनेने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेच्या प्रवक्त्या डाॅ. आमदार मनीषा कायंदे, डाॅ. सुषमा अंधारे, संजना घाडी यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण - पीडितमहिला ही गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून, ती पतीपासून विभक्त झाल्यामुळे सावराटोली येथे बहिणीकडे राहत होती. बहिणीसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्याने ती आपल्या माहेरी जाण्यासाठी एकटीच निघाली होती. रस्त्यात भेटलेल्या आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने वाहनात बसवून मुंडीपार जंगलात नेले. ३० जुलैपासून 2 दिवस त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. दरम्यान, पीडित महिलेने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर ती भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली असता, तेथील दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपीसोबत तिची भेट झाली. या आरोपीसह आणखी एकाने तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला. संबंधित पिडित महिला ही मेडीकल काॅलेज नागपूर येथे भरती आहे. तथापि, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी. पीडित महिलेची प्रकृती बरी झाल्यावर तिचे समूपदेशन करण्यात यावे. मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितेला आर्थिक मदत करावी, अशी मागणीही आमदार डाॅ. मनीषा कायंदे, डाॅ. सुषमा अंधारे, संजना घाडी यांनी केली आहे. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षकांनी या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करू, असे आश्वासन दिले आहे.
शिंदे सरकारवर हल्लाबोल -बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जाऊन दवनीवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीची भेट घेतली आहे. तिची विचारपूस करत शिंदे सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. गोंदिया- भंडारा अत्याचाराची शाही वाळत नाही, तोच गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दवनीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत उघडकिस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर 26 वर्षाच्या तरूणाने भुलथापा देत सतत अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गर्भवती झाल्याचे समजताच नराधमाने मेडिकल स्टोअर्समधून अवैधरीत्या गर्भपाताच्या गोळ्या डाँक्टरच्या प्रीक्रीक्शन शिवाय खरेदी करून जबरदस्तीने या मुलीला खायला दिल्याने तिची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर गोंदियातील बाई गंगाबाई रूग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली, असून शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी बाई गंगाबाई रूग्णालयाला भेट देत पिडीतेची विचारपूस करत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.