भंडारा -महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार शाळेतील पाचवी ते आठवीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यावेळी सरकारने दिलेल्या नियमावलींचे पाल करत शाळेत थर्मल स्कॅन, सुरक्षित अंतर व निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. अनेक महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने बच्चे कंपनीही खुश आहेत.
नियमांचे पालन करत भंडारा जिल्ह्यात वाजली शाळेची घंटा प्रत्येक विद्यार्थ्यांची घेतली जात आहे काळजी
बुधवारी (दि. 27 जाने.) सकाळी 11 वाजेपासून भंडारा जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे बंद झालेल्या शाळा पहिल्यांदाच पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू झाल्या त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी शाळेत पोहोचले. मात्र, या दोघांनाही कोरोनाच्या नियांनाचे पालन करायचे होते. शाळेत फाटकावर प्रवेश करताना विद्यार्थ्यांना हातांवर सॅनिटायझर दिले जात होते. तसेच त्यांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल ही तपासले जात होते. तसेच त्यांची हजेरी लावूनच त्यांना वर्गात सोडले जात आहे.
वर्गात प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थ्यांना बसण्याची सोय
ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त आहे, त्या शाळेत कोरोनापूर्वी तीन विद्यार्थी बसत होते. मात्र, आता कोरोनामुळे प्रत्येक बाकावर एक विद्यार्थी बसणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार 20 विद्यार्थ्यांचे बॅच तयार केली गेली असून त्यानुसारच विद्यार्थ्यांना त्यांच्या ठरलेल्या दिवशी शाळेत यायचा आहे. त्यांचा रोल नंबरनुसार ठरलेल्या बाकावरच बसायचा आहे.
विद्यार्थ्यांसाठी नियमावली
विद्यार्थ्यांना शाळेत डबा आणता येणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह शाळेत यावे रिक्षा किंवा सार्वजनीक साधनांनी येऊ नये. प्रत्येक विद्यार्थ्यांनी मास्क लावावा. शाळेत एकमेकांच्या वस्तूंची देवाणघेवाण करू नये, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
शाळेच्या घंटेसह धोक्याची घंटा
अनेक महिन्यानंतर शाळेची घंटा वाजल्याने अनेक विद्यार्थी आनंदित आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षणांची त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करावी, अशी सूचना केली होती. मात्र, अनेक शिक्षकांच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. एखाद्या शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर शाळेच्या घंटेसह धोक्याची घंटाही वाजण्याची भीती वर्तवली जात आहे.