भंडारा- सॅनफ्लॅग कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात विविध मागण्यांबाबत संघर्ष सुरू आहे. कामगारांना कामावर बोलविण्यात यावे यासाठी कामगारांनी अनेकदा मागणी केली. मात्र कंपनी व्यवस्थापन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने सॅनफ्लॅगआर्यन एन्ड स्टील मजदूर सभाच्या वतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवळपास १०० स्थायी कामगारांनी सहभाग घेतला होता.
मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊनमुळे कंपनी काही काळ बंद होती. १३ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एकूण कामगारांच्या ७५ टक्के कामगारांना कामावर बोलावणे अपेक्षित होते. पण चार महिण्यापासून कंपनी व्यवस्थापनाने अघोषित ले ऑफ धोरण अवलंबिले आहे. कामगारांना हेतुपरस्पर कामावर बोलावणे टाळत असल्याने कामगारांना नियमित कामावर घेण्याबाबत गेल्या चार महिन्यापासून कंपनी व्यवस्थापनाशी वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, कंपनी व्यवस्थापन अडून असल्याने याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह कामगार आयुक्तयांना निवेदन देण्यात आले. तरही यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज कंपनीच्या गेटसमोर या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यादरम्यान, कामगारांनी कंपनी व्यवस्थापन विरोधात घोषणा दिल्या. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय बांडेबूचे, महासचिव मिलिंद वासनिक, उपाध्यक्ष विजेंद्र नेमा, यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते. दरम्यान, कामगारांच्या मागण्यांचे निवेदन व्यवस्थापनाला देण्यात आले.