भंडारा- जिल्ह्याच्या वाळू तस्करांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे. तुमसर येथील तहसीलदारावर झालेल्या हल्ल्याची बातमी ताजी असतानाच वडेगाव रीठी या संरक्षित वन परिक्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या पथकावर ट्रॅक्टर चालवण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 6 आरोपींना अटक केली आहे.
कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करांचा हल्ला हेही वाचा-'आर्थिक विषयांवर केंद्र सरकारचं वागण एखाद्या दारुड्यासारखं'
भंडाऱ्यातील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे येथील वाळूवर तस्करांची नेहमी करडी नजर असते. जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महसूल विभाग आणि पोलीस विभागाने कारवाई केली. मात्र, याचा काही परिणाम झाला नाही. कार्यवाहीसाठी गेलेल्या पोलिसांवर तर कधी तहसीलदारांवर हल्ला होत आहे.
भंडारा तालुक्यातील वडेगाव रीठी संरक्षित वन परिक्षेत्रात वाळूची तस्करी सुरू असल्याची माहिती भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. त्यांना 10 ट्रॅक्टर वाळू तस्करी करत असताना दिसले. त्यातील एक ट्रॅक्टर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडला. मात्र, वन परिक्षेत्र अधिकारी राजुरकर आणि त्यांच्या पथकाला तस्करांनी धक्काबुक्की, हाणामारी करत ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी याची माहिती उपवनसंरक्षक यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी मोसम मोहरकर (वय 24), अमिरराज डोंगरे (वय 28) यांच्यासह इतर 4 असे एकून 6 आरोपींना अटक केली.