भंडारा -जिल्ह्यात शनिवारपासून मद्य विक्रीला सुरुवात झालेली आहे. 4 मेला राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मद्यविक्रीला सुरुवात झाली होती. मात्र, भंडारा जिल्हाधिकारी यांनी यासाठी परवानगी नाकारली होती. मात्र, शुक्रवारी आदेश काढून शनिवारपासून ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्याचे तसेच भंडारा तालुक्यात फक्त बिअर शॉपी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
भंडारा हा ऑरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा आहे. इथे फक्त एक कोरोनाबाधित रुग्ण असून केवळ एक कंटेनमेंट झोन आहे. त्यामुळे भंडारा नगरपालिका हद्दीतील केवळ बिअर शॉपी सुरू करण्यात आल्या आहेत. देशी दारू किंवा विदेशी दारू या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. याउलट ग्रामीण भागातील सर्व देशी दारूचे दुकाने तुमसर, मोहाडी, साकोली, लाखणी, लाखांदूर आणि पवनी या उर्वरित सहा तालुक्यांमध्ये शहराच्या बाहेरील सर्व प्रकारच्या दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. केवळ शहराच्या आतमधील दारूची दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहे.