भंडारा- साकोली तालुक्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या एका तरुणीने नोकरीच्या मागे न धावता पुरुषाचे वर्चस्व असलेल्या ट्रॅक्टर रिपेरिंगच्या कामाला सुरुवात केली आहे. भविष्यातही याच क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे ध्येय या तरुणीचे असून, तिच्या या वेगळ्या निर्णयाचे कौतुक सर्वत्र होत आहे. धनश्री हातझाडे असं या मुलीचे नाव असून ती सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सत्राची ऑनलाईन परीक्षा घरूनच देत आहे.
मेकॅनिकल अभियंता तरुणीने निवडला वेगळा मार्ग; गॅरेजमध्ये करतीय ट्रॅक्टर रिपेरिंग - मुलीचा ट्रॅक्टर गॅरेजचा व्यवसाय
मेकॅनिकल अभियांत्रिकी पूर्ण केलेल्या एका विद्यार्थिनीने गॅरेजमध्ये काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि स्वत:च्या वडिलांच्या ट्रॅक्टर गॅरेजमध्ये हातभार लावयला सुरुवात केली. आता सहजपणे ट्रॅक्टर दुरुस्तकरण्याचे काम करत आहे. तिला पुढे देखील या व्यवसायातच प्रगती करायची आहे. यासाठी तिच्या वडिलांचा तिला पाठिंबा आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर धनश्री साकोलीला तिच्या घरी परतली. साकोली मध्ये तिच्या वडिलांचा ट्रॅक्टर रिपेरिंगचे नावाजलेले गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये जवळपास बारा लोक काम करतात. धनश्री शिक्षण घेत असल्यामुळे तिने कधीही गॅरेजमध्ये काम केले नव्हते किंवा तसा विचारही कधी केला नव्हता. मात्र एक दिवशी जवळपास सहा ते सात ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी आले. मात्र त्यादिवशी एकही कर्मचारी गॅरेजमध्ये आला नव्हता. हीच संधी साधून धनश्रीने वडिलांच्या परवानगीने तिची चुणूक दाखवून दिली. इथूनच धनश्रीच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळाले. तिने याच व्यवसायात करिअर करण्याचा निर्णय घेतला.