महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 20, 2021, 3:45 PM IST

ETV Bharat / state

'हे' अ‍ॅप वापरणाऱ्यांनो सावधान, तरुणीला बसला 94 हजाराला फटका

ऐनी डेस्क (Any desk) या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस अनोळखी व्यक्तीला देणे भंडारा येथील 21 वर्षीय तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे तिच्या अकाऊंटमधील 94 हजार 990 रुपये लंपास करण्यात आले आहेत. तिने पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. पोलीस ऑनलाईन चोरी करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

bhandara
bhandara

भंडारा - तुम्ही ऐनी डेस्क (Any desk) या अ‍ॅपचा वापर करत असाल तर सावधान. मोबाइलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करून दुसऱ्याला अ‍ॅक्सेस देणे भंडाऱ्याचा एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. मोबाइलवर अ‍ॅक्सेस मिळाल्यावर फोन पेद्वारे एका व्यक्तीने चक्क 94 हजार 990 रुपये तिच्या अकाऊंटमधून आपल्या खात्यात वळवल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन चोरीसाठी ऐनी डेस्क (Any desk) वापरत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्यामुळे या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

जयवंत चव्हाण, पोलीस निरीक्षक

फोन पे कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून घातला गंडा

भंडारा जिल्ह्याच्या पांढराबोडी गावातील सेलिना नावाच्या 21 वर्षीय तरुणीला तिच्या मोबाइलवर एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने फोन पे कंपनीचा मैनेजर अविनाश शर्मा असल्याची बतावणी केली. मोबाइलवर आलेले फोन पे चे नोटीफिकेशन वाचले नसल्याचे तरुणीला सांगितले. यामुळे फोन पे अकाऊंट बंद होणार असल्याची भीती घातली. फोन पे बंद करायचे नसल्यास नोटीफिकेशन ओपन करण्यास सांगितले. मात्र, आपल्याला हे ऑपरेट करता येत नसल्याचे पीडितेने सांगितले. यानंतर संबधित पीडितेला गूगल प्ले स्टोअर मधून ऐनी डेस्क अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. पीडितेला या ऐनी डेस्कबाबत माहिती नसल्याने तिने अ‍ॅप डाऊनलोड केले. त्याचा अ‍ॅक्सेस त्या व्यक्तीला दिला. मात्र, काही मिनिटातच तरुणीचा फोन पेचा यूपीआई नंबर मिळवत त्याने तिच्या अकाऊंटमधील तब्बल 94 हजार 990 रुपये आपल्या खात्यात वळवले.

ऐनी डेस्क कसे काम करते?

गूगल प्ले स्टोअर मधून जाऊन हे ॲप कोणीही सहज डाऊनलोड करू शकतो. या ॲपच्या माध्यमातून कोणीही दुसऱ्या व्यक्तीचा मोबाइल, लॅपटॉप कॉम्प्युटर बसल्या जागेवरुन हाताळू शकतात. मोबाइल किंवा कॉम्प्युटरची संपूर्ण माहिती बसल्या जागेवर दिसते. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या या अ‍ॅपचा कोड दुसऱ्याला दिला असेल. त्यामुळे हे अ‍ॅप एक तर वापरू नका किंवा फक्त ओळखीच्या व्यक्तीला आपल्या मोबइल, लॅपटॉप मधील अडचणी सोडविण्यासाठी सांगा.

ऑनलाइन फसवणूक करण्याची नवीन पद्धत

'फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच तरुणीने भंडारा सायबर सेलकडे याबाबत तक्रार दिली. सायबर सेल आता त्या व्यक्तीचा शोध घेत आहे. काही दिवसापासून फेसबुक आणि सोशल मीडियावरून फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. पोलिसांकडून सावध राहण्याचे आवाहन जरी केले जात असले तरी नागरिक मात्र अशा फसव्या व्यक्तीच्या जाळात सहज अडकत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ऐनी डेस्क वापर करणाऱ्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला या अ‍ॅप अ‍ॅक्सेस देऊ नये', असे आवाहन पोलिसांतर्फे केले जात आहे.

'धमक्या-भीतीचे फोन आल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करा'

'फोनवर कोणी अकाऊंट, डेबिट-क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या धमक्या दिल्या तरी या अनोळखी व्यक्तींना आपल्या कार्डची, बँकेची माहिती देऊ नये. ऑनलाईन धोका झाल्यास त्याची माहिती सायबर सेल किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. त्यामुळे तुमचे पैसे चोराच्या खात्यात जाण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न केले जातील', असे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा -'भाजपसोबत जुळवून घ्यावे', प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details