भंडारा -लोकशाहीत सर्वांना सारखी संधी मिळावी यासाठी दिलेल्या आरक्षणाचा फायदा आज ( 6 मे ) भंडारा जिल्ह्यातील एका रिक्षा चालकाला झाला आहे. आयुष्यात कुणालाही कमी लेखू नये. आज चरितार्थासाठी वाट्टेल ते काम करणारा उद्या राजकारणाच्या उच्च पदावर पोहचू शकतो. आता हेच बघा ना, मोहाडी पंचायत समितीच्या सभापती पदावर वरठी गणातून निवडून आलेले रिक्षाचालक रितेश वासनिक यांची सभापती म्हणून निवड झाली आहे. ते मोहाडी पंचायत समितीचे 17 वे सभापती म्हणून विराजमान झाले ( Riksha Driver Became Mohadi Panchayat Samiti Chairman ) आहेत.
रितेश वासनिक हे सभापती पदावर अविरोध निवडून आले आहेत. आज झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापती रितेश वासनिक व उपसभापती बबलू मलेवार सभापती व उपसभापतीच्या खुर्चीवर विराजमान झाले. विशेष म्हणजे मोहाडी येथे भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचाच सभापती होईल, असे गृहीत होते. मात्र, सभापती आरक्षण सोडतीत मोहाडी पंचायत समितीचा सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला होते. पण, भाजपाकडे त्या गटाचा एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडे सभापती पदाची आयती संधी चालून आली.