भंडारा - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्या पैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देणार असल्याचे देखील आरोग्य मंत्री टोपे यांनी जाहीर केले आहे.
घटनेची चौकशीचे आदेश
टोपे म्हणाले की, सरकार दु:खात सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. धुर मोठ्या प्रमाणात होता. यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात जाता येत नव्हते. दुसऱ्या दरवाज्याने ते आत गेले. यामुळे लगतच्या वॉर्डात असलेल्या ७ बालकांना वाचवण्यात यश आले. या घटनेत १० बालकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही या प्रकरणाची निश्चित गंभीर दखल घेऊन, चौकशी करू. पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची देखील काळजी घेऊ.
घटनास्थळी भेट देणार
सद्या मी पुण्यात आहे. मी घटनास्थळी जाणार आहे. पण राज्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. ते नागपूरला आहेत. ते स्पॉट व्हिजीट देतील त्यांना तशा सुचना दिल्या आहेत. ते ११ ते १२ वाजण्याच्या सुमारात तिथे पोहोचतील. यात लागेल ती मदत दिली जाईल. मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत, असे देखील टोपे यांनी सांगितलं.