भंडारा- शासनाने २०१३ साली प्रत्येक नवीन बांधकामाला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविणे गरजेचे केले आहे. बांधकाम परवानगी घेताना सिस्टिम नकाशामध्ये असेल तरच बांधकामाची परवानगी मिळेल, अशी अटही घालण्यात आली. परंतु, लोकांनी शक्कल लढवताना नकाशामध्ये सिस्टिम दाखवली. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बांधली नाही. त्यामुळे शासनाचे या नियमाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
शासनाचा रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम नियम फक्त कागदोपत्रीच; अधिकाऱ्यांचे बांधकामाकडे दुर्लक्ष
शासनाने २०१३ साली प्रत्येक नवीन बांधकामाला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविणे गरजेचे केले आहे. परंतु, लोकांनी शक्कल लढवताना नकाशामध्ये सिस्टिम दाखवली. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बांधली नाही.
भंडारा येथे कृष्ण नगरी फेज-२ मधील बंगले ६ महिन्या अगोदर बनवून तयार झाले आहे. या घरांचा ताबा बिल्डरने घरमालकांना दिला आहे. काही लोक राहायला सुद्धा आले आहेत. मात्र, नियमानुसार यापैकी कोणत्याही घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसवण्यात आली नाही. ही बांधकामे शासन नियमानुसार बांधण्यात आली नाहीत. विशेष म्हणजे याचे बिल्डर भंडारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे हे स्वतः आहेत. केवळ इथेच नाही तर त्यांनी नव्याने बांधलेल्या व्यापार संकुलातदेखील हीच परिस्थिती आहे. परंतु, या सर्व प्रकारावर बोलताना मी नियमानुसारच सर्व केले आहे, अशी प्रतिक्रिया सुनिल मेंढे यांनी दिली आहे.
नव्याने बांधकाम करणाऱ्यांपैकी केवळ १० टक्के लोकच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवितात. नियमानुसार, ज्या घरमालकांनी सिस्टिम बनविली नाही त्यांच्या कडून दुप्पट कर आकारणी करायची आहे. मात्र, नगराध्यक्षांचे बांधकाम असल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांकडून अजूनही दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. यामुळे शासनाच्या नियमाची पायमल्ली तर होतच आहे सोबत शासनाला मिळणारा आर्थिक निधीही बुडत आहे. याबाबत त्यांना विचारले असता, लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल जबरदस्ती करता येत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी यांनी दिली.
सिंचन विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता असलेले पृथ्वीराज फालके त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्व पटवून देण्याचे कार्य सुरू केले आहे. ते स्वतः भाड्याच्या घरी राहत असूनही शेजारील ४ घरांचे पावसाचे पाणी पाइपद्वारे बंद बोरवेल मध्ये सोडत आहेत. त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे कॉलनीतील १०० पैकी ३० घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम सुरू झाली आहे. उर्वरित सर्व घरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम सुरू करून घेण्याचे ठरवले आहे.