भंडारा - ऑनलाइन सर्व्हिसच्या नावावर प्रवाशांना अवैधरित्या रेल्वे तिकीट तयार करून देणाऱ्या साकोली येथील नक्षत्र ऑनलाइन सर्व्हिसेस नावाच्या दुकानावर गोंदिया रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला. यावेळी अवैध रेल्वे तिकीट काढून विकणाऱ्या एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नरेंद्र सुदाम वाडीभस्में असून त्यांच्याकडून 2 लाख 50 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खोटा आयडी तयार करून रेल्वे तिकिटाची अवैध विक्री करणाऱ्यास अटक अधिकचा लाभ कमावन्याच्या दृष्टिने दलालांच्या माध्यमातून ऑनलाइन अवैध तिकीट विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे अशा अवैध तिकीट व्यवसायाला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांची एक खास टास्क टीम नियुक्त करण्यात आली आहे.
या टीमला साकोली येथील नक्षत्र ऑनलाइन सर्व्हिसेस नावाच्या दुकानात बोगस आयडी द्वारे अवैधरित्या रेल्वेचे ई-तिकीट काढून देत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे छापा टाकला असता 1 लाख 71 हजार 624 रुपये किंमितिची 81 ई-तिकीटे त्यांच्याकडे सापडली. याबाबत तपास केला असता आरोपी नरेंद्र वाडीभस्मे याने बोगस आयडी तयार करून अधिक नफा कमावन्याच्या दृष्टिने ही तिकीटे काढल्याचे कबूल केले आहे. त्याला अटक करण्यात आली असून 2 लाख 50 हजार रुपये किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या काळात रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. रेल्वे प्रशासनाच्या वतीने या दलालांवर आळा बसवण्यासाठी विविध उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी हे देलाल नवनवीन शक्कल लढवून अशा पद्धतीने चुकीचे काम करत असतात. रेल्वे प्रशासनाने आज केलेल्या कारवाईमुळे सर्व दलालांचे धाबे दणाणले आहेत.