भंडारा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवरजिल्ह्यातील भंडारा आणि साकोली नगरपालिकेतर्फे 11 ते 13 या तीन दिवसांच्या 'जनता बंद'ला आजपासून सुरुवात झाली. यामध्ये भाजीपाला आणि किराणा या सारखी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने बंद केली. मात्र, दारू दुकाने सुरू असल्याने दारू अत्यावश्यक सेवा तर नाही ना, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यात विशेषतः भंडारा शहरात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता प्रभाव लक्षात घेता, भंडारा शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू नये. सामाजिक संसर्ग रोखला जावा, यासाठी भंडारा नगरपालिकेने शहरात तीन दिवसीय जनता कर्फ्यूचे आदेश काढले.
शुक्रवारी या जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. शहरातील सर्व बाजारपेठा, किराणा, भाजीपाला दुकाने बंद ठेवण्यात आली. मात्र, शहरातील दारूची दुकाने राजरोसपणे सुरू होती. जनता कर्फ्यूचा आदेश काढताना दारू दुकानेही बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद होते. मात्र, बंदमध्येही ही दुकाने सुरू दिसली.
हेही वाचा -घरफोडीचा आरोपी असलेला कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशन वार्डातून फरार, पोलिसांची वाढली डोकेदुखी
याविषयी भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, दारू दुकाने बंद करण्याचा अधिकार आमचा नसून हा राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकारी यांचा असतो. आम्ही तशी विनंती केली होती. मात्र, तरीही दुकाने सुरू असल्याने मी स्वतः जाऊन त्यांना दुकाने बंद करण्याची विनंती करणार आहे. लवकरच सर्व दुकाने बंद होतील, असे त्यांनी सांगितले.
बंद असतानाही नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसले, मात्र हे प्रमाण दरदिवशी पेक्षा कमी आहे. नागरिकांना शहरात फिरण्यासाठी विविध गोष्टींचा आधार घेता येत होता. यामध्ये बस व्यवस्था सुरू होती, बँका सुरू होत्या, शासकीय कार्यालये सुरू होते. भंडारा आणि साकोली वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यात बंद नाही. त्यामुळे नागरिक या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन शहरात फिरताना दिसले.
हेही वाचा -भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती ओसरली, मात्र पाण्यासाठी नागरिकांची भटकंती