महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय भांडणाचा डाक विभागाला फायदा; 7 महिन्यात विकणाऱ्या पोस्टकार्डची केवळ 8 दिवसात विक्री - भंडारा लेटेस्ट न्यूज

आठ दिवसात विकलेले 7000 कार्ड विकण्यासाठी पोस्ट ऑफिसला जवळपास 7 ते 8 महिने लागले असते. मात्र, या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेले पोस्टकार्ड पाठवा आंदोलनामुळे केवळ 8 दिवसात 7 हजार पोस्टकार्ड विकले गेले आहेत.

राजकीय भांडणाचा डाक विभागाला फायदा; 7 महिन्यात विकणाऱ्या पोस्टकार्डची केवळ 8 दिवसात विक्री
राजकीय भांडणाचा डाक विभागाला फायदा; 7 महिन्यात विकणाऱ्या पोस्टकार्डची केवळ 8 दिवसात विक्री

By

Published : Jul 26, 2020, 1:21 PM IST

भंडारा - मराठीमध्ये एक प्रचलित म्हण आहे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. या म्हणीप्रमाणे दोन राजकीय पक्षांचे भांडण आणि पोस्ट कार्डचा लाभ अशी परिस्थिती झालेली आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे एकमेव साधन असलेले ‘पोस्टकार्ड’ इतिहासजमा होण्याच्या अवस्थेत आले आहे. मात्र, मागील काही दिवसात याच पोस्टकार्डचे नशीब जोरावर आहे. दहा दिवसात जिल्ह्यात चक्क 7 हजार पोस्टकार्डची विक्री झाली आणि अजूनही सुरुच आहे.

राजकीय भांडणाचा डाक विभागाला फायदा; 7 महिन्यात विकणाऱ्या पोस्टकार्डची केवळ 8 दिवसात विक्री

ही किमया साधली गेली ती, दोन राजकीय पक्षातील भांडणामुळे! एकमेकांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेले मजकूर लिहून पोस्टकार्ड पाठविण्याचे आंदोलन पोस्टकार्ड आणि डाक विभागाच्या दृष्टीने फायद्याचे ठरले आहे. आठ दिवसात विकलेले 7000 कार्ड विकण्यासाठी पोष्ट ऑफिसला जवळपास 7 ते 8 महिने लागले असते. मात्र, या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेले पोस्टकार्ड पाठवा आंदोलनामुळे केवळ 8 दिवसात 7 हजार पोस्टकार्ड विकले गेले आहेत.

एकेकाळी घरापर्यंत येणारा पोस्टमन हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असायचा. पोस्टमनने आणलेले पत्र तेवढ्याच जिव्हाळ्याने वाचले जायचे. दळणवळणाचे आणि एकमेकांमध्ये संवादाचे एकमेव साधन म्हणूनही त्याकडे जबाबदारीने पाहिले जात आहे. नवनवीन तंत्रज्ञान आले आणि कालांतराने पोस्टाचे पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र मागे पडू लागले. आज पत्र लिहिणे बंद झाले. त्यामुळे पोस्टकार्डची खरेदीही जवळपास ठप्प झाली.

व्यापारी आणि शासकीय कामांच्या दृष्टीने तेवढा या पोस्टकार्डचा वापर होतो. पोस्टकार्डचा असलेला साठा विकण्यासाठी महिनोगणती डाक विभागाला वाट पाहावी लागायची आणि लागते. परंतु मागील आठ दहा दिवसातील चित्र काही वेगळे आहे. दोन राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू झाला. एकमेकांना जाणीव करून देण्याच्या दृष्टीने पक्ष कार्यकर्त्यांनी पोस्टकार्डचा आधार घेतला. हजारो पोस्टकार्डची खरेदी झाली आणि इतिहासात गेलेल्या पोस्टकार्डचे महत्त्व एकदम वाढले. भंडारा डाक विभागातून जिल्हाभरातून मागच्या आठ दिवसात 8 हजारांहून अधिक पोस्टकार्ड विकले गेले.

एकट्या भंडारा जिल्ह्यातून दोन्ही राजकीय पक्ष मिळून 40 हजारांच्या घरात पत्र पाठविण्याचा संकल्प करून आहेत. त्यामुळे दोघांचे हे भांडण सध्या डाक विभागासाठी फायद्याचे ठरत आहे. जे पोस्टकार्ड आजच्या पिढीला माहीत नाही, त्यांना किमान या निमित्ताने ते दृष्टीस पडेल आणि पुन्हा एकदा पोस्टकार्डच्या माध्यमातून भावनांचे आदान प्रदान सुरू होईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. पोस्टकार्डचा वापर प्रचंड कमी झाला आहे. शासकीय काम किंवा व्यवसायी लोकच या कार्डचा आधार घेतात. मात्र, सध्या जे राजकीय वातावरण आहे, त्यात पोस्टकार्डला चांगले दिवस आले आहेत, असे जिल्हा डाक अधिकारी देवगडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details