मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा; (Bhandara and Gondia Zilla Parishads) तसेच त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान आणि 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 आणि त्यांतर्गतच्या 7 पंचायत समित्यांच्या 104; तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 आणि त्यांतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या 106 जागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 1 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल.