भंडारा -आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांना भंडारा जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी तिलांजली दिली आहे. भंडारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात एका बड्या राजकीय व्यक्तीच्या कुटुंबाला चक्क लग्नाची परवानगी दिली होती. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असताना या लग्नाला परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक उपस्थित करत आहेत.
जिल्हा परिषद चौक ते साई मंदिर हा परिसर 20 जूनपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे या क्षेत्रातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. या भागात असलेल्या बँका सुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ जीवनाश्यक आणि अत्यावश्यक सेवा देणारे लोकांना या परिसरात येण्याची परवानगी होती. इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले होते. ज्या लहान दुकानदारांनी या काळात आपली दुकाने सुरु ठेवली त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही सुद्धा करण्यात आली.
एकीकडे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात होती. तर दुसरीकडे त्याच क्षेत्रात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि व्यवसायाने वकील असलेल्या जयंत वैरागडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी प्रशासनाने चक्क कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी दिली. त्या प्रतिबंधित क्षेत्रातील येण्याजाण्याचे सर्व मार्ग बांबूच्या साहाय्याने बंद करण्यात आले असले तरी रविवारी (दि. 28 जून) असलेल्या मांडवाच्या जेवणासाठी शंभर ते दीडशे लोकांनी बांबूंच्या मधून रस्ता मिळवत लग्न घरी प्रवेश केला. कंटेनमेंट क्षेत्रामध्ये लग्नाची परवानगी दिलीच कशी याविषयी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही.
कोरोनाच्या गंभीर महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बनविलेले नियम हे आर्थिक आणि राजकीय परिस्थितीनुसार अधिकारी का बदलतात, असा प्रश्न प्रतिबंधित क्षेत्रातील इतर नागरिक विचारत आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली त्यांच्यावर कायद्याला केराची टोपली दाखविली म्हणून कोणती कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा -भंडाऱ्यात खोटे नियुक्ती पत्र देऊन साडेचार लाखांची फसवणूक.. तोतया पत्रकाराला अटक