भंडारा- जिल्ह्यात पुन्हा दोन नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पवनी तालुक्याच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावीत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज आहे. या दोन रुग्णांसह जिल्ह्याची एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26 वर गेली आहे.
अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पवनीच्या सीमेवर कार्यरत होते. या सीमेवरून जिल्ह्यात आलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. साकोली तालुक्यातील एक रुग्ण हा 26 तारखेला पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यादरम्यान कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना लगेच सिंदेवाही येथे अलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी एक पोलीस निरीक्षकाच्या अहवाल पॉझिटिव्ह आला तर दुसऱ्या पोलीस निरीक्षकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यानंतर अड्याळ पोलीस स्टेशनला कुलूप लावण्यात आले आहे.