भंडारा - तुमसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या रायटरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
रविवारी तुमसर तालुक्यातील राजापूर गावात अंधश्रद्धेच्या संशयावरून 4 लोकांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी तपास करताना पोलीस निरीक्षकासह पोलीस विभागातील सर्वच अधिकाऱ्यांचा या लोकांशी संपर्क आला होता.
रविवारी तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजापूर गावात अंधश्रद्धेच्या कारणावरून चार लोकांना नग्न करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा राजापूर येथे पोहोचली होती. यावेळी 24 लोकांना अटक करण्यात आली होती.
या 24 लोकांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होते. यांना न्यायालयात हजर करण्याची जबाबदारी तुमसरच्या पोलीस निरीक्षक यांच्यावर होती. याच पोलीस निरीक्षकांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. या पोलीस निरीक्षकाच्या संपर्कात ते सर्व आरोपी आणि पोलीस अधिकारी आले आहेत. तसेच आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे तुमसर पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांना होम क्वारंटाईन केले करण्यात आले आहे. आज मंगळवारी जवळपास 35 लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांची तपासणी बुधवारी करण्यात येणार आहे.
दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर आणि भंडारा यांना सुद्धा होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 240 झाली असून 189 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या 47 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.