भंडारा -शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट नावावर बँकेत बचत खाते उघडण्याचा प्रयत्न करणे एका तरुणाला महागात पडले आहे. कागदपत्राची पडताळणी करताना ती खोटी असल्याचे बँक अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी याची तक्रार पोलिसांत केली. भंडारा पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भूषण आडकू भैसारे (30) असे असून ते मानेगाव येथील रहिवासी आहेत.
मूळचा लाखनी तालुक्यतील रहिवासी असलेला भूषण भैसारे याने शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी भंडारा शहरातील जलाराम चौकातील कॉर्पोरेशन बँकेत बचत खाते उघडण्याचे योजना बनविली यासाठी त्याने भंडारा शहरातील मुस्लीम लायब्ररी येथे राहणाऱ्या किशोर भोंगडे यांच्या नावाने खाते उघडण्याचे फॉर्म भरला. त्यासाठी त्याने त्या आधार कार्ड आणि लाईट बिल जोडले. बँकेने याची तपासणी केली असता आधारकार्ड नंबर आणि लाईट बिल हे बनावट असून दीपक विनायक डोकरीमारे यांच्या नावाचे होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शाखा व्यवस्थापकांना माहिती देत शाखा व्यवस्थापक गोपाल पोकळे यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.