भंडारा- आईच्या भटकणाऱ्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी भोंदूबाबाने अघोरी पूजा करण्याची गळ तरुणीला घातली. मृत आत्म्याशी बोलणं करुन देण्याचंही तरुणीला भोंदूबाबानं आश्वासन दिलं. . . भावनेच्या भरात तरुणीनं पूजा करण्याचे मान्यही केले. मात्र आपली फसवणूक होत आल्याचं लक्षात येताच तिनं सावध पवित्रा घेत पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. पोलिसांनी भोंदूबाबासह प्रेयसीलाही बेड्या ठोकल्या. एक निरागस तरुणी भोंदूबाबाची शिकार होताहोता वाचल्याची ही घटना भंडाऱ्यात उघडकीस आली. जितू उर्फ लकी मेश्राम असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव असून त्याची प्रेयसी गीतिशा आरमोरीकरलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
तक्रारदार तरुणीच्या आई-वडिलांचा मृत्यू झालेला आहे. ती लहान भावासह राहत आहे. या संधीचा फायदा घेत गीतिशा आरमोरीकरने या तरुणीला फोन करून तुझ्या आईचा मृत्यू हा जादूटोण्यामुळे झाला असून तुझ्या भावाचाही मृत्यू तसाच होणार आहे. तुझ्या आईच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी आणि तुझ्या आईशी तुझे बोलणे करून देण्यासाठी एक पूजा करावी लागेल. माझ्या ओळखीचे एक बाबा आहेत, तू माझ्या सोबत राजनांदगाव येथे चल, असे सांगितले. सुरुवातीला आई-भावाची भीती दाखविल्याने तरुणीने भावनेपोटी विचार केला. मात्र नंतर या सर्व खोट्या गोष्टी असतात. त्यामुळे माझी फसवणूक करण्याचे प्रयत्न होत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने लगेच याविषयीची माहिती आपल्या एका मित्राला दिली. त्यानंतर त्यांनी भंडारा पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. या तरुणीच्या माध्यमातून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक योजना तयार केली.