भंडारा - शहरातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने स्वतःचा विषय शिकवण्यासाठी अवैध पद्धतीने एका शिक्षिकेला नेमले होते. याची माहिती मिळताच मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी शिक्षणाधिकाऱ्यासह अचानक शाळेला भेट दिली. चौकशी केली असता, हा सर्व प्रकार खरा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या शिक्षकावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भंडाऱ्यातील जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व्ही. एन. भोयर हे विज्ञानाचे शिक्षक आहेत. ते वर्ग पाचवी ते आठवीपर्यंत शिकवतात. मात्र, या शिक्षकाने स्वतःच्या हाताखाली एका खासगी शिक्षिकेला 4 हजार रुपयात नेमले होते. ही शिक्षिका भोयर यांची सर्व तासिका घेत होती, तर शिक्षक शाळेत येऊन फक्त स्वाक्षरी करत होते. या विषयीची त्यांची या अगोदरही तक्रार झाली आहे. मात्र, त्यांच्यावर अजूनपर्यंत कधीही कारवाई केली नाही.
हा सर्व प्रकार नव्याने आलेल्या मुख्य कार्यपालन अधिकारी भुवनेश्वरी यांना शुक्रवारी कळताच त्यांनी त्वरित शिक्षणाधिकारी पाच्चपुरे यांच्यासह जकातदार शाळेला अचानक भेट दिली. मुख्य कार्यपालन अधिकारी शाळेत आल्याचे कळताच शिक्षकांचे धाबे दणाणले, नेमके काय झाले हे समजण्याच्या पहिलेच अधिकारी वर्गात पोहचले आणि त्यांनी माहिती घेतली. तेव्हा हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या विषयी संपूर्ण चौकशीचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देऊन मुख्य कार्यपालन अधिकारी निघून गेल्या.