महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा शहरातील स्विमिंग पूल वर्षभरापासून बंद, खेळाडूंसह पालकांमध्ये रोष - Pool

शहरातील एकमेव स्विमींग पूल वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे खेळाडूंसह पालकांनी रोष व्यक्त केला आहे. १५ दिवसात स्विमींग पूल सुरू न झाल्यास पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बंद असलेला पूल

By

Published : May 17, 2019, 2:00 PM IST

भंडारा- जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूल मागील एक वर्षापासून बंद आहे. शहरातील हा एकमेव स्विमिंग पूल असल्याने जलतरण खेळाडूंना सराव करता येत नाही. त्यामुळे पालकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. याबद्दल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसांत स्विमिंग पूल सुरू न झाल्यास जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकणार असल्याचे सांगितले.

स्विमींग पूल बंद प्रकरण


उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने पालक मुलांना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडांगणावर घेऊन येत आहेत. मात्र स्विमिंग शिकवण्याची इच्छा असणाऱ्या पालकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलाच्या गेटला सध्या कुलूप लावलेले आहे. हा स्विमिंग पूल मागील वर्षभरापासून बंद आहे. मागच्या वर्षी या पुलात बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच हा स्विमिंग पूल बंद करण्यात आला आहे.


कामात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला काही महिने निलंबित राहावे लागले. नंतर त्यांना पुन्हा रुजू करण्यात आले. मात्र स्विमिंग पूल अजूनही बंद पडलेला आहे.
स्विमिंग पुलाच्या पुढच्या गेटला जरी कुलूप लावले असले, तरी मागचे एक गेट तुटलेल्या जाळीचे असल्याने तिथून सहज प्रवेश मिळविता येतो. या परिसरात विद्युत मीटरचे वायर बाहेर निघाल्याने भविष्यात पुन्हा येथे धोका निर्माण होऊ शकतो.


स्विमिंग पूल बंद असल्याने नवीन प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचे तर नुकसान होत आहेच, मात्र जलतरण खेळाडूंना सराव करायला मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या चांगल्या जलतरण खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे.
हा स्विमिंग पूल लवकरात लवकर सुरू करावा, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आगमी पंधरा दिवसात स्विमिंग पूल सुरू न झाल्यास जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या कक्षाला कुलूप लावू, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे.


हा पूल वीस वर्षे जुना असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करायची आहे. दरवर्षी डागडुजी करून हा स्विमिंग पूल सुरू ठेवायचा, मात्र त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करायची आहे. यासाठी जवळपास 61 लाख रुपये खर्च येणार असून आमच्याकडे तेवढा निधी नसल्याने आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे दुरुस्तीसाठी मागणीचे पत्र दिले आहे. आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळाल्यास स्विमिंग पूल शक्य तेवढ्या लवकर सुरु करू, असे जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details