महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा शहरातील दोन दिवसीय कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद - भंडारामध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद

भंडारा जिल्ह्यात सध्याची एकूण रुग्णसंख्या 352 वर पोहोचली आहे. एकट्या भंडारा तालुक्यातील रुग्णसंख्या 106 वर गेली आहे. जिल्ह्यातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Bhandara corona update
भंडारा कोरोना अपडेट

By

Published : Aug 8, 2020, 2:54 PM IST

भंडारा-मागील आठ दिवसांपासून भंडारा शहरात वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि आमदार यांनी मिळून भंडारा शहरात शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू घोषित केला होता. या कर्फ्यूला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता शहर पूर्णपणे बंद आहे.

रुग्णालय, औषधालय, दुग्धजन्य पदार्थ सोडल्यास इतर सर्व सेवा जनता कर्फ्यू दरम्यान बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. भाजी मार्केट, किराणा दुकाने आणि इतर व्यापार पूर्णपणे बंद होते. आज शनिवार असल्याने शासकीय कार्यालय सुद्धा पूर्णपणे बंद होते. एवढेच नाही बस स्थानक सुद्धा आज बंद ठेवण्यात आले होते.

दोन दिवसीय कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकही आज घरीच थांबले. मात्र, तरीही एक ते दोन टक्के नागरिक हे वेगवेगळे कारण देऊन शहरात फिरताना दिसले. या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि नगरपालिकेचे कर्मचारी विविध चौकात उभे होते आणि त्यांच्यावर कारवाई करत होते.

भंडारा जिल्ह्यात सध्याची एकूण रुग्णसंख्या 352 वर पोहोचली आहे. एकट्या भंडारा तालुक्यातील रुग्णसंख्या 106 वर गेली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांनी नियमाचे पालन न करता बाहेर निघण्यास सुरुवात केली होती. कोरोना चे नियम न पडल्यामुळे कम्युनिटी स्प्रेड होण्याची भीती लक्षात घेता हा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. शनिवारी सुरू असलेला जनता कर्फ्यु रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या घरी राहून जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा, अशी विनंती मुख्याधिकारी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details