भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. तर, जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा सुरूच ठेवल्या आणि या सेवा पुरवण्यासाठी काही प्रमाणात वाहतूक सुरू ठेवली. मात्र, या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकांचे जेवणासाठी हाल होत आहेत. तसेच मजूरवर्ग आणि स्थलांतरित होणारे नागरिक यांचीही उपासमार होत आहे. या सर्वांचा विचार करून लाखनी तालुक्यातील विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्रित येत दररोज ३०० लोकांना अन्नदान करण्याचे काम सुरू केले आहे.
लाखनी तालुक्यात गरजूंसाठी धावले नागरिक, दररोज 300 लोकांसाठी जेवण बनवून करतात वितरण
या ट्रकचालकांना जेवण देण्यासाठी लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, व्यापारी यांनी एकत्रित येत दररोज ३०० लोकांसाठी जेवण तयार करून डब्यात भरून देण्याचे काम सुरू केले. रोज दुपारनंतर हे सर्वजण एकत्रित ३०० लोकांचा स्वयंपाक बनवतात. त्यानंतर जेवण डब्यात पॅक करून हे डबे ट्रक चालकांना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे राहून त्यांना दिले जाते.
लाखनी तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. त्यामुळे दररोज जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे ट्रक या मार्गावरून जात असत. मात्र, हॉटेल आणि धाबे बंद असल्याने चालकांवर उपासमारीची वेळ येत होती. या ट्रकचालकांना जेवण देण्यासाठी लाखनी येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, व्यापारी यांनी एकत्रित येत दररोज ३०० लोकांसाठी जेवण तयार करून डब्यात भरून देण्याचे काम सुरू केले. रोज दुपारनंतर हे सर्वजण एकत्रित ३०० लोकांचा स्वयंपाक बनवतात. त्यानंतर जेवण डब्यात पॅक करून हे डबे ट्रक चालकांना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे राहून त्यांना दिले जाते.
तसेच लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या लोकांवरही दोन वेळच्या जेवणाची अडचण निर्माण झाली. त्या लोकांपर्यंतही जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम हे लोक करत आहेत. लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग विविध ठिकाणी अडकलेला असून हे सर्व मजूर अजूनही स्थलांतर करत आहेत. शेकडो किलोमीटर पायी चालत आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या या मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून सुद्धा लाखणी येथील सर्व अन्नदाते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.