भंडारा - भंडारा-गोंदिया मतदारसंघातून कोणता उमेदवार जिंकणार? या एकाच विषयावर चर्चा सुरू झाली आहे. राजकीय विश्लेषकांसोबत जनसामान्यही आपआपल्यापरीने मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त झाले आहेत. ११ एप्रिलला मतदान झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाण, शासकीय कार्यालयासह प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न ऐकायला मिळतो, तो म्हणजे सांग, भाऊ कोण जिंकणार?
निवडणुकीच्या निकालावर चर्चा करताना जनसामान्य गेल्या ११ एप्रिलला भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी मतदान झाले. मात्र, या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. त्यामुळे पुढील ४४ दिवस उमेदवारांना निकालाची ताटकळत वाट पाहावी लागणार आहे. मात्र, निकाल काय असणार? याची सर्वात जास्त उत्सुकता मतदार, राजकीय कार्यकर्त्यांना लागलेली आहे.
उन्हाचा तडाखा वाढला आहे. रोजगार, पाणीटंचाई, वाढती महागाई, असे अनेक प्रश्न जिल्ह्यात आहेत. मात्र, सध्या भंडारा जिल्ह्यात कुठे ही फिरकले तरी निवडणुकीच्या निकालावरच चर्चा रंगलेल्या दिसतात. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात १४ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही भाजपचे सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांच्यामध्ये आहे. आता यापैकी कोणाला कोणत्या तालुक्यातून, जिल्हा परिषद क्षेत्रातून आणि गावातून किती मते मिळाली? त्यातच कोणत्या जातीने कोणत्या पक्षाला मतदान केले? याविषयी भाजप आणि राष्ट्रवादीची बेरीज-वजाबाकी सुरू आहे.
सर्वसामान्य मतदार, लहान कार्यकर्ते मात्र वेगळ्याच पद्धतीने विश्लेषण करताना दिसतात. गावात कोणी किती पैसा वाटला? कोणत्या जातीच्या लोकांनी मतदानाच्या पहिल्या रात्री कशा पद्धतीने जातीचे राजकारण चालवले? एवढेच नाहीतर मागील निवडणुकीत कुठे कमळ चालले होते. या निवडणुकीत त्याठिकाणी घडी चालली की कमळ? या विषयावर त्यांच्या चर्चा चाललेल्या असतात. प्रसंगी ही मंडळी पैज लावण्यासही तयार झालेली पाहायला मिळत आहे.
उमेदवार जिंकल्यानंतर त्यांना काय फायदा किंवा तोटा होणार? याबद्दल त्यांना पुरेपुर कल्पना असते. मात्र, तरीही मोठ्या पोटतिडकीने विचारतात, सांग भाऊ कोण येणार निवडून? येत्या २३ मे'ला निकाल लागणारच आहे. मात्र, तोपर्यंत अशा चर्चा सुरूच राहतील.