भंडारा - विदर्भाची 'काशी' पवनी येथे दरवर्षी भाद्रपद शु. 5 ला ऋषि पंचमीला वैजेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेला दूरवरून हजारो महिला वैनगंगा नदी तीरावर असलेल्या घाटावर पवित्र स्नान करायला येत असतात. मात्र या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोविड-19 ला आळा बसावा म्हणून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. यामुळे यावर्षी ऋषीपंचमीच्या यात्रेला स्थगिती देण्यात आली असल्याचे तहसीदार निलिमा रंगारी यांनी सांगितले.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आदेश जिल्हाधिकारींनी पारित केले आहेत. यामुळे मंदिर समितीने अथवा परस्पर कोणीही ऋषी पंचमीची यात्रा भरवू नये. तसेच दूरवरून येणाऱ्या महिला भगिनींनी सुरक्षेच्या कारणाने तसेच कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी वैनगंगेचे तीरावर असलेल्या वैजेश्वर मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन तहसीलदार निलिमा रंगारी यांनी केले आहे.
दरवर्षी ऋषिपंचमीला पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील पंचवीस ते तीस हजार महिला भगिनी आंघोळीला व पूजा करण्याकरिता येत असतात. या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यात फिजिकल डिस्टनसिंग पाळणे शक्य होणार नाही. तसेच सर्वजण एकाच ठिकाणी आंघोळ करतात. या सर्व गोष्टीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल. जिल्ह्याबाहेरील हजारो लोक पवनीमध्ये येतील. त्यामुळे पवनी शहरात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी भरणाऱ्या यात्रेला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे शेकडो वर्षाची परंपरा खंडित झाली आहे.