भंडारा - साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणारे पालकमंत्री परिणय फुके हे भंडारा-गोंदिया विधानपरिषदचे आमदार आहेत. मात्र, यावर्षी त्यांना साकोली मतदारसंघातून विधानसभेतून निवडणूक लढावी लागत आहे. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे विद्यमान आमदार बाळा काशीवार यांचे तिकीट कापले गेले. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली.
'ईटीव्ही भारत'शी चर्चा करताना परिणय फुके
भाजपने कोणालाही उमेदवारी दिली तरी तो निवडून येतो. मग नाना पटोले यांची भीती होती का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रत्येक वेळेस नवीन चेहऱ्यांना संधी मिळत असते. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत 35 लोकांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, ही भाजपची पद्धत आहे. बाळा काशीवार यांना येत्या काळात नवीन जबाबदारी मिळणार आहे.
हेही वाचा - राज्यमंत्री परिणय फुके, नाना पटोलेंचे शक्ती प्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल
मला लोकांमधून निवडून येऊन आमदार होण्याची इच्छा पहिल्यापासूनच होती. आमचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अमित शहा या वरिष्ठांच्याही मते मंत्रिपद भूषविणाऱ्या लोकांनी लोकांमधून निवडून यावे, असे आदेश असल्यामुळे मला साकोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. माझे विरोधक मला बाहेरील व्यक्ती म्हणून प्रचार करत आहे. मात्र, मी मागील ३ वर्षांपासून भंडारा-गोंदियातून विधानपरिषदेवर आमदार आहे. भंडाऱ्याचा पालकमंत्री आहे. या ३ वर्षांत मी जिल्ह्यासाठी खूप काम केले आहे आणि माझे मतदान हे भंडारामध्ये आहे. असे असताना मी बाहेरील व्यक्ती कसा? असा प्रश्न त्यांनी यावेळेस आपल्या विरोधकांना विचारला आहे. मी केलेल्या कामामुळेच मतदार मला निवडून देतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यास इतिहासात पहिल्यांदाच या मतदारसंघाला एक मंत्री मिळणार आहे. तसेच या मतदारसंघाला मंत्री मिळाल्यास या जिल्ह्याचा नक्कीच विकास होणार आहे. त्यामुळे लोक मला निवडून देतील आणि या निवडणुकीत मी जवळपास 70 हजार मतांनी निवडून येईन, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा - साकोली मतदारसंघातील जनतेला अजूनही विकासाची प्रतीक्षा